Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडचा व्यसनमुक्तीचा निर्धार! हजारो विद्यार्थ्यांनी घेतली ‘नशामुक्त भारत’ची सामूहिक शपथ

 

आयपीएस सूरज गुंजाळ यांचे आवाहन : "व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा खरा पाया"; शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

मनमाड | प्रतिनिधी | ७ ऑगस्ट
व्यसनमुक्त आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी मनमाड शहराने शुक्रवारी महत्त्वाचे पाऊल टाकले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या 'विकसित भारत की पहचान – नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत व्यसनमुक्त समाज घडविण्याची सामूहिक शपथ घेतली.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र शासन, नाशिक ग्रामीण पोलीस, मनमाड नगर परिषद तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस सूरज गुंजाळ यांनी युवकांना अमली पदार्थ व इतर सर्व व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्रसेवेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. "व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा खरा आधार आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.


पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी व्यसन हे व्यक्ती, कुटुंब आणि समाजासाठी घातक संकट असल्याचे सांगत युवकांनी व्यसनमुक्ती चळवळीचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले. नगराध्यक्ष बबलू पाटील यांनी मनमाड शहर व्यसनमुक्त करण्यासाठी प्रशासन, पालक, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी संयुक्तपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.


पोलीस निरीक्षक विजय करे यांनी अमली पदार्थांच्या सेवनाचे कायदेशीर आणि सामाजिक परिणाम स्पष्ट केले, तर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश घराघरांत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली.


छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, इंडियन हायस्कूल, एच.ए.के. हायस्कूल, के.आर.टी. स्कूल, गुड शेफर्ड स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीची सामूहिक प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, प्रा. सुभाष अहिरे, कुलसचिव समाधान केदारे, प्रा. डी. व्ही. सोनवणे, डॉ. संजय चिंचोले, प्रा. समाधान सुखदेवे, प्रा. विठ्ठल फंड, कार्यालयीन अधीक्षक एल. के. निकम, शहरातील पत्रकार तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पवनसिंग परदेशी, लेफ्टनंट प्रकाश बर्डे आणि डॉ. आरती छाजेड यांनी विशेष परिश्रम घेतले.


व्यसनमुक्त भारताच्या दिशेने मनमाडने दिलेला हा सामूहिक संदेश युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ करणारा आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या