Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन अलर्ट; २४x७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

 

मनमाड | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर मनमाड नगर परिषद प्रशासनाने पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शहरात २४ तास कार्यरत राहणारा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहून सतत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी यासंदर्भात स्वतंत्र कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार . रविंद्र थोरे व मिलिंद शेळके यांची नियंत्रण कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली असून, मुसळधार पाऊस किंवा आपत्तीजन्य परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी ते २४x७ उपलब्ध राहणार आहेत.

तसेच नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी मनमाड नगर परिषदेने व्यापक तयारी सुरू केली आहे. नगररचना विभागाने २९ मे २०२६ रोजी कार्यालयीन आदेश जारी करून विविध विभागांतील १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली आहे. 

यापूर्वी २९ मे २०२६ रोजीच नगर परिषदेने सर्व विभागप्रमुख व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील पाणी साचणारे व पूरप्रवण भागांची पाहणी, भूमिगत गटारांवरील तुटलेली झाकणे बदलणे, नाले व नदीपात्रातील गाळ आणि पानवेली हटविणे, धोकादायक इमारतींची तपासणी, आपत्कालीन साहित्य व बचाव पथके सज्ज ठेवणे, नगर परिषदेची वाहने व जेसीबी कार्यक्षम स्थितीत ठेवणे, तसेच नागरिकांना हवामान विभागाच्या इशाऱ्यांची वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच मान्सून काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, रजा देताना आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात अडथळा येणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नगर परिषद प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अतिवृष्टीच्या काळात अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० अन्वये कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या