Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नाशिक जिल्हा सज्ज! अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर SDRF तैनात, मंदिरे बंद

 

नाशिक जिल्हा सज्ज! अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर SDRF तैनात, मंदिरे बंद

त्र्यंबकेश्वरसह नाशिक ग्रामीण, इगतपुरीत
मंगळवारी ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा
जिल्हा प्रशासन सतर्क, नागरिकांनी दक्षता बाळगावी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती


• त्र्यंबकेश्वर, वणीचे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार.
• त्र्यंबकेश्वर, नाशिक ग्रामीण, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आठवडे बाजार बंद राहणार.
• शेतकरी बांधव, नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.
• गडकिल्ले, पर्यटनस्थळी राहणार नाकाबंदी. 


  नाशिक, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवार 7 जुलै, 2026 रोजी ढगफुटी सदृश अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आपत्ती निवारणाचे सूक्ष्म नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर, वणी येथील सप्तश्रृंग देवीचे मंदिर तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीण, पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, आठवडे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही दक्षता बाळगावी. आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचा पट्टा
अरबी समुद्रावर तयार होत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्याचा पश्चिम भागात उद्या ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सुमारे ३०० मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई (निवडणूक) आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याच्या काही भागात ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतर्क झाले असून उपाययोजना सुरु केल्या आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या दिवशी नाशिक शहर महानगरपालिका कार्यक्षेत्र वगळता उर्वरित ग्रामीण भाग, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा या तालुक्यातील आठवडे बाजार, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. शेतकऱ्यांनीही शेतात जाणे टाळावे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल, तरच घराबाहेर पडावे. या परिसरातील आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेले काही रस्ते सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात येतील. 

त्र्यंबकेश्वर, वणीचे मंदिर दर्शनासाठी राहणार बंद
या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर व वणीचे मंदिर बुधवार (९ जुलै) सकाळपर्यंत दर्शनसाठी बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर व वणी येथे येण्याचे टाळावे. पूर क्षेत्रातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागातील लहान- मोठ्या बंधाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार दरवाजे उघडण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. जलसंपदा विभागाला कालव्यांची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर सार्वजनिक बांधकाम विभागाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

पर्यटनस्थळे, धबधब्यांवर पोलिसांचा बंदोबस्त
जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणे, गडकिल्ले, धबधब्यांच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तेथे पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान, आपदा मित्रांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) एक तुकडी मागविण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपापल्या मुख्यालयी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई- दिल्ली हा महत्वाचा लोहमार्ग इगतपुरी तालुक्यातून जातो. त्यामुळे रेल्वे विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागातील प्रसुतीचा कालावधी पूर्ण होणाऱ्या महिलांना आजच रुग्णालयात दाखल करून घेण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अत्यावश्यक काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा तत्पर : ओमकार पवार
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले की, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे या भागातील शाळा बंद ठेवण्यात येतील. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आपापल्या मुख्यालयी थांबतील. आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आवश्यक अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपापल्या मुख्यालयी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्वांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.

पोलिसांची नाकाबंदी सुरू : डॉ. स्वामी
पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी सांगितले की, पोलिस दलाने ग्रामीण भागात नियोजन केले आहे. आवश्यकतेनुसार नाकाबंदी सुरू केली असून पर्यटनस्थळे, गडकिल्ले आणि धबधब्यांच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या मदतीला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे म्हणाल्या, की जलसंपदा विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

  या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी सतर्क राहून, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, वाहत्या पाण्यातून प्रवास टाळावा, दरडी कोसळणाऱ्या भागात जावू नये. असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या