Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राज्यभरातील बाजार समिती कर्मचाऱ्यांचा एल्गार; अन्याय सहन करणार नाही – डॉ. डी. एल. कराड

 

सीटू संलग्न कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी युनियनची पहिली राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये; शासनाने मागण्या न मानल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कार्यरत हजारो कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता राज्यव्यापी लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली असून, शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी युनियन (सीटू संलग्न) ने दिला आहे. नाशिक येथील सीआयटीयू कामगार भवनात रविवारी झालेल्या संघटनेच्या पहिल्याच राज्यस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सीआयटीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी युनियनचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड होते. राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने बैठकीला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले.

मार्गदर्शन करताना डॉ. कराड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोणत्याही कर्मचाऱ्यावर सभापती, संचालक मंडळ किंवा अन्य कोणाकडूनही बेकायदेशीर अन्याय झाल्यास तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हक्कासाठी सीआयटीयू संघटना ठामपणे लढेल."

बैठकीत बाजार समित्यांमध्ये कार्यरत सहाय्यक सचिव ते शिपाई या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात सामावून घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच त्यांच्या वेतनासह सर्व भत्त्यांचा खर्च पणन मंडळामार्फत करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी राज्याचे पणन मंत्री यांची लवकरच भेट घेऊन संघटनेच्या मागण्या सादर करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

बैठकीत संघटनेची राज्यभर उभारणी, सभासद नोंदणी वाढविणे आणि कर्मचारी संघटना अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यातील सर्व बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या सहभागातून तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

या बैठकीस सीआयटीयूचे कॉ. ठोंबरे, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष कॉ. अरुण आहेर, उपाध्यक्ष विजय दराडे व संजय पवार, सरचिटणीस कॉ. बळीराम गायकवाड, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सचिव संघाचे अध्यक्ष कॉ. विलास पुंडकर, सचिव शुभम चितळकर यांच्यासह रुपेश कातकडे, अशोक मिसर, कैलास पवार, हेमंत पोटिंदे, सुरेंद्र साबळे, सुनील बर्डे, अजय जाधव (मंठा), धनराज चिमणे (चिखली), सुमित गोटे (वाशिम), नंदकुमार परदेशी (कळवण), नरेंद्र काळे, रवींद्र आहेर (कळवण), भाऊसाहेब हिरे, संदीप केदार, शुभम धुळकर (मालेगाव), नागेश झबेराव (शेगाव) यांच्यासह राज्यभरातील विविध बाजार समित्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचा समारोप "संघटना अधिक सक्षम, व्यापक आणि कर्मचारीहितासाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना म्हणून उभी राहील," असा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या