Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये गढूळ पाण्याची समस्या; नगरपरिषद सतर्क, पाणी उकळूनच पिण्याचे आवाहन



मनमाड | प्रतिनिधी
मनमाड शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणारे पाणी गढूळ असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होताच मनमाड नगरपरिषद प्रशासनाने तातडीने याची दखल घेत जलपुरवठा व्यवस्थेची पाहणी आणि तांत्रिक तपासणी सुरू केली आहे. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली.
नगरपरिषदेच्या तपासणीत मागील पाणीपुरवठा फेरीदरम्यान शहरातील विविध जलकुंभांमध्ये साठविण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून सुरुवातीच्या टप्प्यात होणारा पाणीपुरवठा काही प्रमाणात गढूळ असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात तातडीने तांत्रिक सुधारणा करून पाण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करंजवण धरण परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाण्यात नैसर्गिकरित्या गढूळपणा वाढला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करूनही काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात गढूळपणा जाणवू शकतो. मात्र, जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीनेशन व निर्जंतुकीकरणासह सर्व आवश्यक प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असून पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत येणारे पाणी पिण्यासाठी वापरू नये, स्वच्छ पाणी साठवून त्याचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.

पावसाळ्यात जलस्रोतांमध्ये गढूळपणा वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात मनमाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत, "नगरपरिषद प्रशासन सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी पूर्णपणे सतर्क असून नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी," असे सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या