Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरातील मोकाट जनावरांच्या उपद्रवावर नगरपरिषदेची प्रभावी उपाययोजना; नगराध्यक्ष योगेश पाटील यांची गोशाळेला प्रत्यक्ष भेट

 


मनमाड शहरात वाढत असलेल्या मोकाट जनावर उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मनमाड नगरपरिषदेने मोकाट जनावरे पकडण्याचे काम जनवर्धिनी बहुविकास सेवाभावी संस्था, मनमाड यांच्याकडे सोपविले आहे. सदर संस्थेमार्फत शहरातील मोकाट जनावरे पकडून मनमाड नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी नगर क्र. 2 येथील पाणी टाकीलगत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या गोशाळेत सुरक्षितरीत्या ठेवण्यात येत असून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी नगरपरिषदेमार्फत पार पाडली जात आहे.

मोकाट वळू व जनावर पकडण्याचा प्रयत्न केल्यास ती उधळून नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित संस्थेमार्फत प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात येते. मात्र, या कारवाईबाबत काही नागरिकांकडून गैरसमज निर्माण झाल्याने तसेच काही प्रसंगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी वाद व मारहाणीचे प्रकार घडल्याने कारवाईमध्ये अडथळे निर्माण झाले होते.

याशिवाय नगरपरिषदेच्या गोशाळेत ठेवण्यात आलेल्या जनावरांच्या संगोपनाबाबत काही तक्रारी व टीका-टिप्पणी होत असल्याने आज मनमाड नगरपरिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष . योगेश  पाटील यांनी छत्रपती शिवाजी नगर क्र. 2 येथील गोशाळेस प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

पाहणीदरम्यान गोशाळेतील गायींचे संगोपन समाधानकारक पद्धतीने सुरू असल्याचे आढळून आले. नगरपरिषदेमार्फत जनावरांच्या देखभालीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सुमारे 10 ते 15 दिवस पुरेल इतका चारा व पशुखाद्य उपलब्ध असल्याची माहिती यावेळी घेण्यात आली. जनावरांच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे, स्वच्छता राखणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नगराध्यक्षांनी संबंधित कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, शहरात कुठेही मोकाट जनावर आढळल्यास मनमाड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. तसेच जनवर्धिनी बहुविकास सेवाभावी संस्थेमार्फत सुरू असलेल्या जनावरे पकडण्याच्या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न प्रभावीपणे सोडविणे शक्य होईल व अपघातांना आळा बसेल.

यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह शिवसेना गटनेते महेंद्र शिरसाठ उपस्थित होते.
मनमाड नगरपरिषदेने शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीतता आणि मोकाट जनावरांच्या योग्य संगोपनासाठी राबविलेली ही मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या