मनमाड | प्रतिनिधी मनमाड शहरातील एफ.सी.आय. रोडला यापूर्वीच ‘शहीद अब्दुल हमीद मार्ग’ असे नाव देण्यात आले असले तरी त्या नावाचा दर्शनी नामफलक अद्याप लावण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आकर्षक कमान उभारून ‘शहीद अब्दुल हमीद मार्ग’ असा स्पष्ट नामफलक लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन मनमाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष. योगेश (बबलूभाऊ) पाटील यांना देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशासाठी बलिदान देणारे वीर शहीद अब्दुल हमीद यांचे नाव रस्त्याला देणे हा सन्मानाचा विषय असला तरी तो प्रत्यक्षात दिसून यावा, यासाठी प्रवेशद्वारावर कमान व नामफलक आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना मार्ग ओळखणे सुलभ होईल तसेच नव्या पिढीला शहीदांच्या बलिदानाची प्रेरणा मिळेल.

निवेदन देताना नगरसेविका शबाना सादिक पठाण, नगरसेवक बबू कुरेशी, अमजद रशीद पठाण, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, नगरसेवक आमीन पटेल, मजीद दादा, आप्पा आंधळे, रवी निकम, आसमा सादिक तांबोळी तसेच लोकेश साबळे आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर या मागणीची दखल घेऊन ‘शहीद अब्दुल हमीद मार्ग’ नामफलक व कमान उभारणीचे काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.