Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड बाजार समितीवर आरोपांना सभापतींचे जोरदार प्रत्युत्तर; “शेतकरी हिताचे निर्णयच प्राधान्य”



मनमाड (प्रतिनिधी) : कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड येथे विरोधी गटातील उपसभापती व काही संचालकांनी केलेल्या आरोपांना सभापती संजय सयाजी पवार यांनी कडक शब्दांत उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय हेतूने बाजार समितीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सभापती पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विरोधी गट सत्तेत असताना अनेकदा कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यात आले नाही. सहा-सहा महिने संचालक मंडळाच्या बैठकाच घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आज विरोधात असलेल्या सदस्यांनी कायद्याचे धडे देऊ नयेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, संबंधित उपसभापती व संचालक हे महत्त्वाच्या सभांना उपस्थित राहत नसल्याने त्यांना निर्णय प्रक्रियेची माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बाजार समितीच्या जागा भाडेकराराने देण्याबाबतचे निर्णय पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार घेण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले. ३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. वापरात नसलेल्या व अतिक्रमणाच्या धोक्यात असलेल्या जागांचा योग्य वापर करून समितीचे उत्पन्न वाढविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

पवार यांनी आपल्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख करत सांगितले की, पूर्वी बाजारात २०० ते ३०० नगांची आवक होत होती, ती आता ८०० ते १००० नगांपर्यंत वाढली आहे. बाजार समितीचे कामकाज हायटेक व ऑनलाइन करण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शेतकऱ्यांसाठी शौचालयांची सुविधा उपलब्ध करणे यांसारखी कामे करण्यात आली आहेत.
दरम्यान, मार्केटिंग फेडरेशन, वखार महामंडळ व वन विभागाला पूर्वी दिलेल्या जागांबाबतही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. करारनामे संपुष्टात आल्याने संबंधित जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या लिलावासाठी वापरण्याचा समितीचा मानस आहे. वखार महामंडळाने या संदर्भात मालेगाव सत्र न्यायालयात दावा दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होणार आहे, तर वन विभागाची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विरोधी गटाने सत्तेत असताना केलेल्या कथित बेकायदेशीर कामांबाबत बाजार समिती कायद्याच्या कलम ५३ अंतर्गत चौकशी लवकरच सुरू होणार असल्याचा इशाराही पवार यांनी दिला.

“मी सभापती म्हणून काम करत असताना केवळ शेतकरी व बाजार समितीच्या हिताचेच निर्णय घेत राहीन. विरोधकांच्या आरोपांना घाबरणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या