मनमाड : इंदूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड कॅम्प परिसरात भीषण वाहतूक कोंडीत अडकलेल्या गर्भवती ऊसतोड मजूर महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर रिक्षाचालक आणि एका तरुणाच्या तत्परतेमुळे रिक्षामध्येच सुरक्षित प्रसूती होऊन गोंडस मुलीचा जन्म झाला. विशेष म्हणजे ही घटना पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी घडल्याने परिसरात याची मोठी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार कुटुंब नंदूरबारकडे जात असताना गर्भवती महिला आवेश वडवे यांना अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. पतीने तत्काळ त्यांना मनमाड येथे रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र महामार्गावरील तीव्र वाहतूक कोंडीमुळे वाहन पुढे सरकू शकत नव्हते.
यावेळी प्रसंगावधान दाखवत रिक्षाचालक अमजद अत्तार यांनी महिलेला आपल्या रिक्षामध्ये घेतले. सामाजिक कार्यकर्ते रितेश पगारे यांनी गर्दीतून मार्ग मोकळा करण्यासाठी पुढे चालत मदत केली. दरम्यान, कोंडीच्या मध्यभागीच रिक्षामध्ये प्रसूती होऊन निरोगी मुलीचा जन्म झाला.
घटनेनंतर आई व बाळाला तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, मनमाड परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर वाढत चाललेली वाहतूक कोंडी आपत्कालीन सेवांसाठी धोकादायक ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान, मनमाड परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर वाढत चाललेली वाहतूक कोंडी आपत्कालीन सेवांसाठी धोकादायक ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही होत आहे.


0 टिप्पण्या