Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

त्र्यंबकेश्वर मंदिरात बनावट दर्शन पासचा काळाबाजार उघड; ५ जणांना अटक, १६४८ पास जप्त


नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात ऑनलाइन दर्शन पासच्या काळाबाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीने बनावट नावे, पत्ते आणि ओळखपत्रांचा वापर करून १६४८ बनावट देणगी दर्शन पास काढून भाविकांना २०० रुपयांचा पास ७०० ते १००० रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गैरप्रकारामुळे सुमारे ५,००० भाविकांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.

मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मोफत दर्शन रांग आणि २०० रुपये शुल्काची देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून माध्यमांमधून ऑनलाइन दर्शन पासच्या काळाबाजाराच्या बातम्या समोर येत होत्या. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष, अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्र्यंबकेश्वर परिसरातून दिलीप नाना झोले (पेगलवाडी, त्र्यंबक), सुदाम राजू बदादे (पेगलवाडी, नाशिक), समाधान झुंबर बोथे (रोकडवाडी, त्र्यंबक), शिवराज दिनकर आहेर (निरंजनी आखाडा, त्र्यंबक), आणि मनोहर मोहन शेवरे (रोकडवाडी, त्र्यंबक) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाइल आणि ईमेल हिस्ट्रीच्या तपासात बनावट पासचा काळाबाजार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२५ अंतर्गत कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली.

तपासात ऑनलाइन दर्शन पास सिस्टीममध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले असून, मंदिर प्रशासनाने यात तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवी मगर आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गावित, जाधव, मुळाणे, ठाकरे,  बोराडे आणि राठोड यांनी केली.

प्रतिबंधक उपाय:मंदिर प्रशासनाने ऑनलाइन दर्शन पास सिस्टीममध्ये सुधारणा करण्याचे ठरवले असून, भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत. भाविकांना अधिकृत पंडित किंवा ताम्रपत्रधारी गुरुजींमार्फतच पूजा आणि दर्शनाची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या