Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांचा पाठपुरावा; आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने प्रशासनाला निवेदन, तातडीने उपाययोजनांचे आदेश



मनमाड: मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी शिवसेना मनमाड शहर आणि रुग्ण कल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण कल्याण समितीचे सदस्य दिनेश घुगे आणि महिंद्र गरुड यांनी नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांना निवेदन सादर करून रुग्णालयातील समस्यांवर चर्चा केली. या निवेदनात रुग्णालयातील अनेक महत्त्वाच्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला असून, त्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख समस्यांमध्ये आय.सी.यू. सुविधा गेल्या दोन वर्षांपासून बंद असणे, फिजिशियन आणि सर्जन डॉक्टरांची कमतरता, सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने सेवा मिळत नसणे, स्त्रीरोग तज्ज्ञांची अनुपलब्धता यामुळे महिलांना मालेगाव व धुळे येथे जावे लागणे, कायमस्वरूपी निवासी डॉक्टर आणि एम.डी. मेडिसिन तज्ज्ञांची गरज, १०८ रुग्णवाहिकेची विलंब सेवा, नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांचे रुग्ण व नातेवाइकांशी असहकार्य, बेडशीट आणि वॉशिंग मशीनची कमतरता, पाण्याची टंचाई, रुग्णालयातील अस्वच्छता, लटकलेल्या इलेक्ट्रिक वायर्समुळे धोका, औषधांचा अपुरा साठा, कुत्रा चावण्याची लस, रक्तगट तपासणी कीट आणि बेरोजगार तरुणांना फिटनेस सर्टिफिकेट वेळेवर न मिळण्याच्या समस्यांचा समावेश आहे.

या सर्व समस्यांवर चर्चा करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. रुग्णालयातील सुविधा सुधारण्यासाठी आणि रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि रुग्ण कल्याण समितीने घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांनी स्वागत केले असून, लवकरच रुग्णालयातील सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
मनमाडमधील रुग्णसेवेच्या सुधारणेसाठी शिवसेनेचा हा पुढाकार नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे. रुग्णालयातील समस्यांचे निराकरण झाल्यास स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या