Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा



स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या कारभारावर संताप

मनमाड | प्रतिनिधी
मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनमाड शहर शाखेने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सर्वपक्षीय व सर्वसामान्य वीज ग्राहकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मनमाड शहर आणि ग्रामीण भागात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, अनेकदा चार-चार तास तर कधी दोन-दोन दिवस वीज गायब राहत आहे. याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, व्यापारी व्यवहार, शिक्षण आणि उद्योगधंद्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महावितरणमधील काही अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जीपणा व निष्क्रियतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत, नागरिकांच्या तक्रारींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

यासोबतच, वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, तसेच प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसारच वीजबिल आकारावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मीटर रीडिंग घेताना संबंधित ठेकेदारांनी स्पष्ट छायाचित्रे घेऊन योग्य नोंद ठेवावी, जेणेकरून ग्राहकांना अचूक वीजबिल मिळेल, असेही निवेदनात नमूद आहे.

वीजवाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या छाटणे, वायर बदलणे किंवा इतर देखभाल कामांसाठी वीजपुरवठा बंद करावा लागणार असल्यास किमान एक दिवस आधी एसएमएस, सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे किंवा इतर अधिकृत माध्यमांतून नागरिकांना पूर्वसूचना देण्याची व्यवस्था करावी, अशी महत्त्वाची मागणीही करण्यात आली आहे.

मनमाड शहर व परिसरातील कायमस्वरूपी वीज समस्येवर तातडीने तोडगा काढून अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, पीडित वीज ग्राहक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनमाड शहर शाखेचे पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या