Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जिद्दीच्या बळावर मनमाडच्या सायकलपटूंची ३८० किमी 'सायकल वारी' यशस्वी

 


नाशिक ते पंढरपूर तीन दिवसांत ध्येयपूर्ती; भक्ती, शिस्त आणि जिद्दीचा प्रेरणादायी संगम

मनमाड | प्रतिनिधी
अखंड भक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि अटळ जिद्दीच्या बळावर मनमाडच्या सायकलपटूंनी नाशिक ते पंढरपूर अशी तब्बल ३८० किलोमीटरची सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण करत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत रॉयल रायडर्स आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भक्तिमय मोहिमेत मनमाडच्या सायकलपटूंनी उत्साहाने सहभाग घेत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत आपली वारी पूर्ण केली.

वारीचा शुभारंभ १० जुलै रोजी पहाटे नाशिक येथून उत्साहपूर्ण वातावरणात 'फ्लॅग ऑफ' करून झाला. पहिल्याच दिवशी सिन्नर घाटाचे आव्हान स्वीकारत सायकलस्वारांनी जिद्दीने घाट सर केला. सिन्नर येथे अल्पोपहार, नादूर शिंगोटे येथे हायड्रेशन पॉईंट आणि राहुरी येथे भोजनानंतर खडबडीत रस्त्यांवरून प्रवास करत सायंकाळी अहिल्यानगर येथे मुक्काम करण्यात आला. कठीण प्रवासानंतर विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

दुसऱ्या दिवशी पहाटे अहिल्यानगरहून निघालेल्या पथकाने तब्बल १६० किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण करून टेंभुर्णी येथे मुक्काम केला. संपूर्ण मार्गावर "ज्ञानबा-तुकाराम" आणि "विठ्ठल-विठ्ठल"च्या अखंड जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. मार्गात भेटणाऱ्या वारकऱ्यांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन हेच या प्रवासाचे बळ ठरले.

तिसऱ्या आणि अंतिम दिवशी टेंभुर्णीहून पंढरपूरकडे अंतिम टप्पा सुरू झाला. श्री विठ्ठलाच्या पवित्र नगरीत प्रवेश करताच तीन दिवसांचा सर्व थकवा क्षणात नाहीसा झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल वारकऱ्यांचे भव्य सायकल रिंगण आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाने सर्व सहभागी भावविभोर झाले

या प्रेरणादायी सायकल वारीत छत्रे विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रवीण व्यवहारे, सिद्धी क्लासेसचे संचालक डॉ. भागवत दराडे, युवा उद्योजक गणेश वाहले, सौ. संगीता कदम, सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. योगेश मगर आणि डॉ. निलेश हारदे यांनी सहभाग घेत मनमाडचे नाव अभिमानाने उंचावले.

वारीनंतर भावना व्यक्त करताना सहभागी म्हणाले, "वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर आत्मशुद्धीचा आणि भक्तीचा अनुभव आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची निस्सीम श्रद्धा आम्हाला प्रेरणा देणारी ठरली. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीमुळे ३८० किलोमीटरचा खडतर प्रवासही आनंदमय झाला."

ही सायकल वारी केवळ अंतर पार करण्याची मोहीम नव्हती, तर आरोग्य, शिस्त, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि विठ्ठल भक्तीचा सुंदर संगम ठरली. मनमाडच्या सायकलपटूंनी आपल्या जिद्दी, चिकाटी आणि श्रद्धेच्या जोरावर समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला असून त्यांच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या