Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमधील 600 गोरगरीब हातमजूर व छोट्या व्यावसायिकांवरील अतिक्रमण कारवाई थांबवा; अन्यथा पाकीजा कॉर्नर समोर आमरण उपोषण — रवींद्र निकम यांचा इशारा

 

मनमाड : मनमाड शहरातील सुमारे 600 गोरगरीब हातमजूर, छोटे व्यापारी, हातगाडेधारक, टपरी चालक व कष्टकरी नागरिकांवर प्रस्तावित अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी, अन्यथा पा पाकीजा कॉर्नर समोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा गंभीर इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता मा. रवींद्र चंद्रकांत निकम यांनी प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात मा. आमदार सुहास (अण्णा) कांदे, मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व मनमाड शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळानंतर अनेक छोटे व्यावसायिक आर्थिक संकटातून सावरत असतानाच मनमाडमध्ये रोजगाराच्या संधी नसल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. मात्र आता नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण हटाव मोहिमेची तयारी सुरू असून यामुळे शेकडो गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रवींद्र निकम यांनी प्रशासनाला आवाहन करताना म्हटले की, “हातगाडा, टपरी किंवा छोटा स्टॉल लावून व्यवसाय करणारे हे लोक गुन्हेगार नसून परिस्थितीशी झुंज देणारे कष्टकरी नागरिक आहेत. त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेणे म्हणजे गरीबांवर अन्याय करण्यासारखे आहे.”

तसेच नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आल्याचे व काही भागांची व्हिडिओ शूटिंग करण्यात आल्याचे वृत्तपत्रांतून समजल्याचेही त्यांनी नमूद केले. “ज्या गोरगरीब जनतेने नगरसेवकांना निवडून दिले, त्यांच्याच उपजीविकेवर घाला घालणारे निर्णय घेणे हे दुर्दैवी आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

मा. आमदार सुहास (अण्णा) कांदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रशासनाला कारवाई थांबवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शेवटी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर 600 गरीब व्यावसायिकांचे अतिक्रमण काढून त्यांना व्यवसायापासून दूर करण्यात आले, तर त्यांच्या न्याय व हक्कासाठी मी स्वतः पाकीजा कॉर्नर समोर आमरण उपोषण करेल. माझ्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.”
या निवेदनामुळे मनमाड शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून गरीब हातमजूर व छोट्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या