Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड रेल्वे स्थानक परिसरातील टॅक्सी–रिक्षा प्रतिबंध : प्रवाशांच्या अडचणींवर प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा



मनमाड रेल्वे स्थानक हे देशातील मध्यवर्ती आणि महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखले जाते. उत्तर–दक्षिण, पूर्व–पश्चिम दिशांना जाणाऱ्या शेकडो गाड्या येथून जात असल्याने दररोज हजारो प्रवासी मनमाड रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. मात्र गेल्या तब्बल पंधरा दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडून स्थानक परिसरात टॅक्सी व रिक्षा उभ्या करण्यास मज्जाव करण्यात आला असून यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

स्थानकाबाहेर उतरलेले प्रवासी आपापल्या गावी, कार्यालयात, दवाखान्यात किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी–रिक्षांवर अवलंबून असतात. परंतु सध्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात टॅक्सी–रिक्षा लावण्यास मनाई करण्यात आल्याने प्रवाशांना सामानासह लांब चालत जावे लागत आहे. वृद्ध, महिला, लहान मुले व आजारी प्रवासी यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे, टॅक्सी व रिक्षा चालकांवरही मोठे संकट ओढवले आहे. स्थानक परिसरात उभे राहता येत नसल्याने ते शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनं उभी करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून शहर पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. परिणामी, “वाहनं कुठे लावायची?” असा गंभीर प्रश्न टॅक्सी–रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे.

ही परिस्थिती केवळ चालकांची नव्हे तर सामान्य प्रवाशांची आणि संपूर्ण शहराच्या वाहतुकीची समस्या बनली आहे. रेल्वे प्रशासन, नगरपालिका आणि शहर पोलीस प्रशासन यांनी एकत्र बसून तातडीने योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र टॅक्सी–रिक्षा स्टँडची व्यवस्था करणे, वाहतुकीस अडथळा न होईल अशा पद्धतीने जागा निश्चित करणे आणि प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मनमाड हे केवळ शहर नाही तर देशाच्या रेल्वे नकाशावरचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. टॅक्सी–रिक्षा बंदीने जर प्रवाशांना त्रास होत असेल, तर त्या निर्णयाचा पुनर्विचार करून व्यवहार्य तोडगा काढला पाहिजे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या