Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगर परिषद निवडणूक : प्रभाग क्र. १० (अ) च्या उमेदवाराच्या निधनामुळे सदस्य पदाची निवडणूक स्थगित; अध्यक्षपदाची निवडणूक मात्र सुरूच

 

मनमाड, दि. २६ नोव्हेंबर २०२५मनमाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० (अ) मधून सदस्य पदासाठी वैधरीत्या नामनिर्देशित उमेदवार श्री. नितीन अनिल वाघमारे यांचे दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे प्रभागातील निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.

महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ चे नियम २३ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १० (१) व (२) नुसार, प्रभाग क्र. १० हा दोन सदस्य जागांचा (१० अ आणि १० ब) संयुक्त प्रभाग असल्याने उमेदवाराच्या निधनामुळे दोन्ही सदस्य जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, प्रभाग क्र. १० (अ) व प्रभाग क्र. १० (ब) येथील सदस्य पदाच्या निवडणुकीला (अध्यक्षपद वगळून) पूर्णपणे स्थगिती देण्यात आली आहे. या दोन्ही जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

मात्र, अध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होत असल्याने आणि ती प्रभागनिहाय नसल्याने, प्रभाग क्र. १० मधील अध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.त्यामुळे अध्यक्षपदासाठी मतदान व मतमोजणी यात कोणताही बदल होणार नाही.

प्रशासनाने सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. निधन झालेल्या उमेदवार श्री. नितीन वाघमारे यांना नगरपरिषदेच्या वतीने आणि सर्वपक्षीय नेत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.मनमाडकरांना लवकरच या प्रभागातील नवीन निवडणूक तारखा कळवल्या जातील. तोपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन निवडणूक यंत्रणेने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या