नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनच्या गोल्डन अवर सायबर मदत संकल्पनेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. कसबे वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील एका तक्रारदाराची शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली 36 लाख रुपयांची फसवणूक होत असताना, सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 20,15,874 रुपये थांबवण्यात यश मिळवले आहे.  

तक्रारदाराला सायबर भामट्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, तक्रारदाराने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 36 लाख रुपये जमा केले. सायबर भामट्यांनी दिलेल्या बनावट अॅपमध्ये त्यांना दुप्पट रक्कम दिसत होती, परंतु पैसे काढण्यासाठी अतिरिक्त टॅक्सच्या नावाखाली आणखी रक्कम मागितली गेली. यावेळी तक्रारदाराला फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशनच्या 7666312112 या क्रमांकावर संपर्क साधला.  

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्वात पोउपनिरीक्षक दिगंबर थोरात आणि पोलीस हवालदार प्रमोद जाधव यांनी त्वरित कारवाई केली. सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवून तक्रारदाराने जमा केलेल्या रकमेची माहिती घेत 20,15,874 रुपये थांबवण्यात यश मिळवले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.  

नागरिकांना आवाहन:  
नाशिक ग्रामीण पोलीसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी फोन कॉल्स किंवा लिंक्सवर विश्वास ठेवू नये, बँक खात्याची माहिती शेअर करू नये आणि फसवणुकीची शंका आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन (0253-2200408 / 7666312112) येथे संपर्क साधावा. ऑनलाइन तक्रारींसाठी 1930, 1945 किंवा 14407 वर कॉल करा.  

नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांचे कौतुक:
गोल्डन अवर सायबर मदत संकल्पनेच्या माध्यमातून तात्काळ कारवाई करत लाखो रुपयांचे नुकसान टाळणाऱ्या नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.