Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महावितरणचा विजेचा खेळखंडोबा: अधिकारी-ठेकेदारांचा कामचुकारपणा, नागरिक त्रस्त!


महावितरणचा विजेचा खेळखंडोबा: अधिकारी-ठेकेदारांचा कामचुकारपणा, नागरिक त्रस्त!

रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित, फोन बंद, तक्रारींकडे दुर्लक्ष; मनमाडकरांचा संताप

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराने नागरिक आणि व्यापाऱ्यांचे हाल होत असून, महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या कामचुकारपणामुळे हा त्रास वाढला आहे. पावसाळ्याच्या काळात सकाळी, रात्री, कधी अर्धा तास तर कधी चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरत असून, सरपटणारे प्राणी बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता फोन बंद किंवा उचलले जात नसल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि यंत्रणेतील दोष दुरुस्त न करणारे ठेकेदार यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "यापूर्वी वारा-पाऊस असतानाच वीज खंडित होत होती, पण आता दिवसातून अनेकदा, अगदी पाच-दहा मिनिटांनी वीज गायब होते," अशी खंत स्थानिक व्यापारी वर्गाने व्यक्त केली.

संबंधित ठेकेदाराने देखभाल आणि दुरुस्तीची कामे नीट न केल्याने तांत्रिक समस्या कायम आहेत. तक्रारींचे निरसन करण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागते, तरीही समस्यांचे समाधान होत नाही. "अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नाही. कुणाकडे दाद मागावी?" असा सवाल मनमाडकर करत आहेत.

या गंभीर समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, तसेच जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत हा विजेचा खेळखंडोबा आणि नागरिकांचा त्रास कायम राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या