Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 आजचे राजकारण फक्त स्वार्थासाठी आहे का ? पक्ष निष्ठा, देशप्रेम गेले कुठे ?

स्वातंत्र्या नंतर राजकीय पक्ष म्हणजे एक विचारधारा होती. पक्षाची स्थिती काहीही असली तरी पक्षांतराचे प्रमाण नगण्य होते. त्याला कारण म्हणजे पक्षाचे तत्व, पक्षाशी निष्ठा आणि एक विचारधारा होती. कॉंग्रेस पक्षाने निर्विवादपणे सुमारे ७० वर्ष सत्ता उपभोगली. याचे कारण म्हणजे भारतातील सिक्यूलॅरीजम ! सर्व भारतीय मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो, समान आहेत अशा विचारधारे मुळे भारतीय जनतेने कॉंग्रेस पक्षाला भरभरून मतदान केले. एकीकडे जातीयवादाची भीती दाखवून ‘आम्हीच खरे सिक्युलर आहोत’ असा देखावा किंवा भास निर्माण करून भोळ्या भाबड्या जनतेला गाजर दाखवून बराच काळ सत्ता उपभोगण्याचे कार्य काँग्रेसने केले. तत्कालीन जनसंघ, मुस्लीम लीग सारख्या नॉन सिक्युलर पक्षांना जनतेने नाकारले होते. प्रत्येक राजकीय पक्षात तत्व, पक्षनिष्ठा आदी बाबींचा विचार करून पक्षप्रमुख निवडले जात होते. मग ते सिक्युलर पक्ष असो की नॉन सिक्युलर ! त्या नंतर हळूहळू गणित बदलू लागले. तत्वनिष्ठा, विचारधारा सर्वकाही बाजूला सारीत त्याची जागा ‘स्वार्था’ने काबीज केली. स्वार्थासाठी पक्षांतराचे प्रमाण इतके वाढले की ज्याने सायंकाळी दुसऱ्या पक्षावर टीका केली, तो सकाळी त्या पक्षात सामील झाला. तिकीट मिळाले नाही, मला पक्षात डावलले गेले आदी ‘मला’ म्हणजेच स्वार्थाला कवटाळून पक्षांतराची लाट आली जी अजून ओसरली नाही आणि कदाचित ओसरणार नाही. कालांतराने जनतेने काँग्रेसला नाकारले. तरीही बऱ्याच प्रमाणात अल्पसंख्यांक समाज आणि सिक्युलर विचारधारा असलेले मतदार हे कॉंग्रेस सोबतच राहिले. मात्र सत्तेच्या लालसेपोटी ‘हिंदू खतरे मे है’ ‘इस्लाम खतरे मे है’ सारखी विचारधारा रुजवून देशाच्या एकतेला व अखंडतेला कमकुवत करण्याची मोहीम या राजकीय लोकांनी राबविली व त्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी सुद्धा झालेत. (राजकीय व्यक्ती म्हणजे कुठल्या एका पक्षाचा नव्हे) तर प्रत्येक पक्ष सत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी आपापल्या तथाकथित धर्माचे, देशाचे कैवारी असल्याचा आव आणून देशात अराजकता माजवून स्वार्थ सिद्धी करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. CAA, NRC सारख्या मुस्लिमांवर उघडपणे अन्याय करणाऱ्या कायद्यांना अल्पसंख्यांक व सिक्युलर मतदारांच्या मतांवर निवडून आलेल्या तथाकथित कॉंग्रेसच्या नेत्यांनी व इतर पक्षांनी संसदेत एकदाही विरोध का केला नाही ? शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवलेल्या कायद्याच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय झाला, त्यांना चिरडून टाकण्यात आले, त्यावेळी सुद्धा या पक्षांनी फक्त देखाव्यासाठी बॉर्डर पर्यंत जावून ‘आम्हाला प्रवेश दिला नाही’ असा कांगावा केला. मात्र शेतकरी अडून राहिले म्हणून ते सफल झाले. यात कुठल्याही राजकीय पक्षाचा वाटा नव्हता व नाही. पक्ष कुठलाही असो, सत्ता हा एक व्यापार / धंदा झाला असून प्रस्थापित नेते आपली मुले, मुली, सुन, भाऊ आदींना पुढे आणून सत्ता हातातून जावू नये यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांशिवाय पक्षात ‘लायक’ नेते नाहीत का ? यावरून हे सिद्ध होते की आजचे राजकारण हे देश हिताचे नसून फक्त व्यक्तिगत स्वार्थसिद्धी साठीच आहे. यात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून, धार्मिक स्थळांविषयी खोट्या अफवा पसरवून, जातीय द्वेष निर्माण करून, अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांचा धाक दाखवून, स्वार्थ सिद्धी साठी देशाच्या एकतेला, अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्याचा उद्योग चालवला आहे. सर्व देशप्रेमी नागरिकांनी वेळीच सावध होऊन लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा विचार करून देशाला अशा स्वार्थी नेत्यांपासून वाचवावे एवढेच काय ते आपल्या हातात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या