Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


मतदार यादीतील दुबार नावे कमी करण्याचे आवाहन


नाशिक दिनांक 21 ऑक्टोबर 2021 


मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व 15 मतदार संघात मतदार नोंदणी अधिकारी यांच्यास्तरावर पडताळणीचे काम सुरू आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी मतदार यादीत दुबार नाव असल्यास फॉर्म नंबर 7 भरून नाव कमी करून घेण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, मतदार नोंदणी अधिकारी 123 नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ यांचेकडील मतदार यादीत मतदारांची दुबार नावे असल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर मतदार यादीतील दुबार नावांच्या पडताळणीचे कामकाज सुरू आहे. प्राप्त मतदार याद्यांमधील नावांची पडताळणी करण्यासाठी नागरिक, राजकीय पक्ष,  अन्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांना खात्री करता यावी यादृष्टीने दुबार मतदारांच्या याद्या www.nashikmitra.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.


या याद्यांची यथोचित पडताळणी झाल्यानंतर विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाव वगळण्याबाबत कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर करण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यादीत नमुद मतदारांच्या रहिवासाच्या ठिकाणी भेट देऊन घरोघर तपासणी करणार आहेत. सदर तपासणी दरम्यान सर्व मतदार, नागरिक, राजकीय पक्ष यांनी यादीतील नावांची पडताळणी करुन दुबार नाव नोंदविले गेले असल्यास ज्या ठिकाणी संबधित मतदाराचा सर्वसाधारण रहिवास आहे, त्या मतदार यादीतील नावं कायम ठेऊन दुसऱ्या मतदार यादीतील नावे तातडीने वगळण्यात यावे त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे फॉर्म 7 भरुन देणे आवश्यक असल्याचेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.


मतदारांना त्यांच्या नावाची खात्री करावयाची असल्यास www.nvsp.in या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, मतदारांना मतदार नोंदणीबाबत अधिक माहिती हवी असल्यास कार्यालयीन वेळेत टोल फ्री क्रमांक 1950 व संबधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या