मनमाड वर्कशॉपचे कॉम्रेड दीपक पगारे यांची मुख्यालय कमिटी मेंबरपदी निवड
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; मनमाड शाखेतर्फे सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव
मनमाड, प्रतिनिधी : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, मध्य रेल्वे व कोकण रेल्वेचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या मुख्यालय कमिटी मेंबर्सच्या बैठकीत मनमाड वर्कशॉपचे वरिष्ठ कॉम्रेड तथा सीनियर सेक्शन इंजिनिअर कॉम्रेड दीपक पगारे यांची नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या मुख्यालय कमिटी मेंबरपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे मनमाड वर्कशॉपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कॉम्रेड दीपक पगारे यांनी रेल्वे कर्मचारी आणि संघटनेच्या प्रश्नांसाठी सातत्याने सक्रिय भूमिका बजावत संघटनात्मक कार्याला बळ दिले आहे. त्यांचे संघटन कौशल्य, कामगार प्रश्नांची जाण आणि पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन यामुळे मनमाड शाखेच्या कार्याला मोठी दिशा मिळाली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा उपयोग आता मुख्यालय पातळीवरही संघटनेला होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दीपक पगारे यांच्या निवडीबद्दल नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना मनमाड शाखेच्या वतीने त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. शाखेचे सचिव कॉम्रेड चंद्रमणी बाबूजी, खजिनदार कॉम्रेड अशफाक खान आणि संघटन सचिव कॉम्रेड चंदन कुमार यांच्या हस्ते पगारे यांचा सत्कार करून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड संतोष सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कॉम्रेड नितीन पगारे यांनी केले. कॉम्रेड नितीन पगारे, कॉम्रेड अशफाक खान आणि कॉम्रेड चंदन कुमार यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून दीपक पगारे यांच्या निवडीचे स्वागत केले.
कार्यक्रमास शाखेच्या महिला उपाध्यक्ष कॉम्रेड शीतलताई सोनवणे, कॉम्रेड मनोज गाजरे, रवींद्र चौधरी, महेंद्र शेवाळे, कपिल चौधरी, भवानी शंकर मीना, अतिक शेख, पंकज अहिरे, राहील शेख, जयकुमार, स्वप्निल ओहळ, प्रफुल पवार, विशाल बागुल यांच्यासह नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाडच्या कामगार संघटनात्मक चळवळीला नवी ताकद
कॉम्रेड दीपक पगारे यांची मुख्यालय कमिटी मेंबरपदी झालेली निवड ही केवळ त्यांचा सन्मान नसून मनमाड वर्कशॉपमधील कामगारांच्या प्रश्नांना व्यापक पातळीवर मांडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीमुळे मनमाड शाखेतील पदाधिकारी व कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या