Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू? दुर्गंधीयुक्त पाण्यात आढळले लाल जंतू; वंचित बहुजन आघाडीचा नगर परिषदेला इशारा

 

"कर वसुली करता, मग नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी कोणाची?" — विलास आहिरे यांचा सवाल

मनमाड | प्रतिनिधी.
मनमाड शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, गेल्या काही दिवसांपासून शहरात पुरवठा होत असलेल्या पाण्यात दुर्गंधी येत असल्याच्या तसेच पाण्यात डोळ्यांना दिसणारे लाल जंतू (किडे) आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहराच्या वतीने शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी मनमाड नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन दिवसांच्या अंतराने मिळणारे पाणीही जर दूषित आणि आरोग्यास घातक असेल तर नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


दूषित पाण्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.


वंचित बहुजन आघाडीने नगर परिषद प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत—
जलशुद्धीकरण केंद्राची तातडीने तपासणी करण्यात यावी.
 पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची स्वच्छता व योग्य प्रमाणात क्लोरिनेशन करण्यात यावे.
पाण्यात मैलापाणी किंवा गटारीचे पाणी मिसळत आहे का, याची तातडीने चौकशी करण्यात यावी.
 दूषित पाणीपुरवठ्याचे मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.

"नागरिकांकडून कर वेळेवर वसूल केला जातो, मात्र त्यांना मूलभूत सुविधा म्हणून शुद्ध पाणी मिळत नसेल तर ही प्रशासनाची गंभीर निष्काळजीपणा आहे," असा आरोप विलास आहिरे यांनी केला.

येत्या २ ते ३ दिवसांत स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनमाड नगर परिषदेसमोर तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

मनमाडकरांच्या आरोग्याचा प्रश्न; प्रशासनाने तातडीने जागे होण्याची गरज — नागरिकांची मागणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या