नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या २९ कोटींहून अधिक रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी दौलतराव शंकरराव ठाकरे याला अखेर बोईसर, पालघर येथून ताब्यात घेतले. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या या सराईत गुन्हेगाराला गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक करण्यात आली. 

येवला शहर पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर २०२२ रोजी दाखल गुन्हा (क्र. ३०२/२०२२) अंतर्गत ठाकरे याच्यासह पतसंस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांनी संगनमताने खोटी आर्थिक पत्रके तयार करून ठेवीदार आणि सभासदांची २९,०२,४१,५३१/- रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी गोळा करून त्या परत न केल्याने भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४०९, १२०(ब), ३४ तसेच एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याशिवाय ठाकरे याच्याविरुद्ध येवला पोलीस ठाण्यात आणखी पाच गुन्हे (क्र. २३५ ते २३८, २४२/२०२२) दाखल आहेत.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, तेगबीरसिंग संधु आणि पोलीस उपअधीक्षक जे. एम. करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात प्रवीण मासुळे, कैलास काकड, मोहन पवार, हेमंत गिलबिले आणि प्रदिप बहिरम यांचा समावेश होता. 

अटकेनंतर ठाकरे याला न्यायालयात हजर केले असता, ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.