Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा सोहळा: 27वी दावत इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न

 

नांदगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा सोहळा: 27वी दावत इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न

नांदगाव (प्रतिनिधी): नांदगाव शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी 27व्या दावत इफ्तार पार्टीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो मुस्लिम बांधवांनी हिंदू बंधूंसोबत एकाच प्लेटमध्ये बसून सायंकाळी 6:45 वाजता रोजा सोडला. सर्वधर्म समभाव आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा सोहळा शहरात कौतुकाचा विषय ठरला.

या प्रसंगी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, उपनगराध्यक्ष नितीन जाधव, नगरसेवक याकूब शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी पाच वर्षीय चिमुकल्यांचा—सय्यद उम्रन मोहम्मद अली, शेख रोहान हाजी फैसल, झिकरा वसीम शेख, अशमीरा सोहेल रंगरेज, हमझेन शकील शेख आणि अबूजर जफर शेख—गुलाब पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या कार्यक्रमात एक सुंदर बॅनर लक्ष वेधून घेत होते. या बॅनरवर 1949 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मौलाना हजरत मोहिन साहेब यांच्यासोबत बसून रोजा सोडल्याचा ऐतिहासिक छायाचित्र आणि त्यामागील बंधुत्वाचा संदेश प्रदर्शित करण्यात आला होता. या नियोजनाचे आणि छत्रपती शाहू महाराज ग्रुपच्या कार्याचे सर्व उपस्थित मान्यवरांनी आणि मुस्लिम बांधवांनी भरभरून कौतुक केले. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर (नाना) जाधव आणि अध्यक्ष प्रशांत गरुड यांचे विशेष आभार मानले गेले.

रमजान हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या काळात जननिर्जली रोजा ठेवून अन्न-पाण्याचा त्याग केला जातो आणि कुराणाचे पठण करत अल्लाची इबादत केली जाते. या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम नांदगावच्या सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला. डॉ. सुनील तुसे यांनी आपल्या वडिलांच्या निवडणूक काळातील आठवणींना उजाळा देत, “नांदगाव शहर हे महाराष्ट्रात 100 वर्षांपासून गोडी-गोविंदाने नांदत आहे आणि असेच राहावे,” अशी भावना व्यक्त केली. उपनगराध्यक्ष नितीन जाधव यांनी हिंदू-मुस्लिम उर्स कमिटीच्या ऐक्याचे उदाहरण देत, “कधी अध्यक्ष मुस्लिम तर कधी उपाध्यक्ष हिंदू असतो,” असे सांगून एकतेचा संदेश मजबूत केला. मनोज चोपडे यांनीही न्याय, समता आणि बंधुत्वावर प्रकाश टाकला.


मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रुपचे आभार मानत त्यांचा सन्मान केला आणि सर्वधर्म समभावाचा हा संदेश कायम राहावा, अशा शुभेच्छा दिल्या. हिंदू बांधवांनीही ईदच्या शुभेच्छा देत हा सोहळा अधिक आनंदमय केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जफर शेख, सोहेल रंगरेज, गौतम काकाळीज, भावराव इघे, ऋषी जाधव, दीपक मोरे, सोमनाथ चौधरी, किरण पवार, प्रमोद पगारे, प्रज्ञानंद जाधव, सलमान बेग, नकुल खरे, राहुल बागुल, सनी पवार यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि इतर समाजातील बंधूंनी एकत्र बसून या इफ्तार पार्टीचा आनंद घेतला. नांदगावच्या या अनोख्या परंपरेने पुन्हा एकदा सर्वधर्म समभाव आणि बंधुत्वाचा आदर्श निर्माण केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या