नांदगाव, दि. 24 एप्रिल 2025: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने नांदगाव येथे निषेध रॅली काढली. या हल्ल्यात निर्दोष हिंदू पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत 28 ते 30 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला संबोधत, शिवसेनेने भारत सरकारकडे फुटीरतावादी संघटनांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने हुतात्मा चौकातून निषेध रॅली काढली. “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅली पोलिस स्टेशनपर्यंत गेली, जिथे पोलिस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अशा दहशतवादी संघटना समूळ नष्ट करून या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्याची मागणी करण्यात आली. 

शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांनी सांगितले की, “वारंवार होणाऱ्या अशा घटना थांबल्या नाहीत, तर देशभरात असंतोष निर्माण होईल. सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत.” या रॅलीत विष्णू निकम, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, दीपक मोरे, अय्याज शेख, रमेश काकळीज, भैय्यासाहेब पगार, संतोष शर्मा, मधुकर मोरे, संजय सानप, शरद उगले, मुस्ताक शेख, बापू जाधव, भिकन खटके, शरद आयनोर, तानसेन जगताप, भगीरथ जेजुरकर, भारती बागोरे, सद्दाम शेख, महेंद्र गायकवाड, दिनेश ओचानी, जय खरोटे, सुरज पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.