Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र देण्याच्या विशेष मोहिमेला मुदतवाढ

: आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे


नाशिक दिनांक 18 ऑक्टोबर 2021.

आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभासाठी कागदपत्रांच्या पुर्तेतेत शिधापत्रिका व जातीचा दाखला महत्त्वपूर्ण आहे. या कागदपत्रांच्या अभावामुळे आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहीमेस 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


आदिवासी विकास विभागाच्या शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसार, आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ मिळण्याकरिता कुटुंबाची शिधापत्रिका, अनुसूचित जमातीचा दाखला आणि आधार कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या कागदपत्रांच्या अभावी आदिवासी बांधव शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये तसेच कोरोना कालावधीतील निकषांचा विचार करता 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत या विशेष मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आदिवासी विकास आयुक्त श्री. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


या अनुषंगाने सर्व अपर आयुक्त यांच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व प्रांत अधिकारी यांच्यामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी सुरु आहे. शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासाठी लागणारे शुल्क हे केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) या योजनेतून अदा करण्यात येणार असल्याने स्थानिक स्तरावर संबंधिताना प्रस्तुत दाखले विनामुल्य उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे ही विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील आवाहन करण्यात येत आहे, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या